२ – मिळकतींची यादी

 

माझ्या सर्व मिळकतींची यादी माझ्याजवळ तयार असणे हे केव्हांही चांगले. अशी यादी माझ्याजवळ तयार असेल, तर माझ्या हयातीत त्या मिळकतींची व्यवस्था नीट पाहणे मला सोपे होईल . मिळकतींच्या बारीकसारीक तपशीलांसह अशी यादी करायला कमीतकमी १५ दिवस तरी लागतात. योग्य तेवढा वेळ देऊन, शांतपणे मी ही यादी तयार करायला हवी. मी मृत्युपत्र केले किंवा केले नाही तरी अशी यादी तयार करणे फार गरजेचे आहे.

या यादीमध्ये माझ्या सर्व स्थावर व जंगम मिळकती, आर्थिक गुंतवणुकी, विमा पॉलिसी, वाहने, क्रेडीट कार्ड्स, दागदागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, माझ्याकडे असलेल्या प्राचीन मौल्यवान वस्तू यांचा समावेश असेल. काही इतर मौल्यवान गोष्टींचा अशा यादीत नोंदल्या पाहिजेत असे मला वाटते तर अशा सर्व गोष्टींचा उल्लेखही या यादीत असतील. ही यादी अशा प्रकारे परिपूर्ण आणि अद्ययावत केली पाहिजे की यादी पाहून प्रत्येक मिळकतीबाबतची किंवा वस्तूबद्दलची संपूर्ण माहिती मला कधीही मिळाली पाहिजे.

आता मला एक वही लागेल, किंवा एक भरपूर पाने मावतील अशी मोठी फाईल. प्रत्यक्षातली वही किंवा फाईल पाहिजे. कॉम्पुटरवरची ई-वही किंवा ई-फाईल नव्हे. अर्थात हाताने लिहिणं वाचवण्यासाठी मी एक करू शकेन. ही यादी मी एम-एस-वर्ड किंवा एम-एस-एक्सेल मध्ये टाईप करू शकेन आणि त्याचा प्रिंटआऊट काढून माझ्या वहीत चिकटवू शकेन किंवा फाईल मध्ये लावू शकेन. मिळकतींच्या तपशिलांमधले बदल नोंदण्यासाठी मी त्या त्या वेळी हाताने लिहीत जाईन. असे केल्याने हे काम लवकर होईल. माझ्या मिळकतींच्या नोंदी अद्ययावत तपशीलांसह लिखित स्वरूपात माझ्याजवळ असणे, ही खूपच दिलासा देणारी गोष्ट आहे. माझ्यानंतर माझ्या मिळकतींचा हा तपशील एकत्रितपणे, एका ठिकाणी उपलब्ध असेल…

प्रत्येक प्रकारच्या मिळकतीसाठी स्वतंत्र यादी करावी लागेल. या यादीमध्ये खालीलप्रमाणे गोष्टींचा समावेश असेल.

  • मिळकतीचे वर्णन
  • मिळकत कोणाच्या मालकीची आहे? माझ्या एकट्याच्या मालकीची आहे की सामायिक मालकीची आहे? – जर सामायिक मालकीची असेल, तर इतर मालकांची नावे. मिळकतीच्या नोंदीवर ही नावे ज्या क्रमाने लिहिलेली आहेत, त्याच क्रमाने मी लिहीन.
  • रक्कम कोठे गुंतवली आहे? उदा. बॅंकांची नावे, म्युच्युअल फंड, कंपनी इ.
  • मिळकतीबद्दल माहिती – उदा. अकाऊंट क्रमांक, फोलिओ क्रमांक, इतर आवश्यक क्रमांक, विमा पॉलिसी क्रमांक इ.
  • मुदत ठेवींमध्ये गुंतवलेली रक्कम, युनिट्स (शेअर्स किंवा म्युच्युअल फंड), मुदत पूर्ण होण्याची तारीख, विमोचानाची (रिडेम्प्शन) ची तारीख ( जर करात सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक केलेली असेल तर.)
  • नामनिर्देशन (nomination)  ज्याच्या नावे केलेले आहे, त्याचे नाव
  • इतर माहिती. उदाहरणार्थ बॅंकांचे इ-मेल पत्ते आणि संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक, तातडीने संपर्क साधायचा असल्यास फंड मॅनेजर्स चे दूरध्वनी क्रमांक

स्मार्ट टी व्ही, वाहने अशा वस्तूंची यादी करताना   मी प्रत्येक वस्तूसमोर त्या वस्तूचा उत्पादक, विक्रेता, ती वस्तू विकत घेतल्याची तारीख आणि तिचा वॉरन्टीचा काळ या ही गोष्टी लिहीन. दागिने किंवा चांदीची भांड्यांची यादी करताना त्या दागिन्याचे किंवा भांड्याचे पारंपारिक नाव, त्यांचे वर्णन, वजन आणि ती वस्तू माझ्याकडे कशी आली, म्हणजे ती माला वारशाने मिळाली, कोणी मला भेट दिली का मी ती विकत घेतली, याचा उल्लेख करेन.

माझी क्रेडीट कार्ड्स, डेबीट कार्ड्स, इतर कार्ड्स यांचीही यादी करेन. मी वापरत असलेल्या online payment च्या सुविधांचाही, उदा. इ-वॉलेट, पे-पाल, यांचाही यादीत उल्लेख करेन.

जर मी लेखिका किंवा कलाकार असेन, तर माझ्या कृतीचा कॉपीराईट माझ्याकडे असेल. जर मी संशोधक असेन, तर माझ्या संशोधनाचा पेटंट हक्क माझ्याकडे असेल. जर माझा व्यवसाय असेल, तर माझी व्यावसायिक मालमत्ता आणि त्या व्यवसायात मी कमावलेली पत माझ्याकडे असेल. या सर्व गोष्टींची यादी तयार करावी लागेल.

या सर्व याद्या तयार झाल्या की माझ्या लक्षात येईल की, मला वाटत होतं, त्यापेक्षा मी कितीतरी श्रीमंत आहे!!

अनुवाद : स्वाती कुलकर्णी.
मूळ लेख : नीलिमा भडभडे. मूळ इंग्रजी लेखासाठी येथे क्लिक करा.

मागचा लेख: प्रास्ताविक      Introduction
पुढचा लेख : “माझ्या” मिळकती कोणत्या?     What are ‘my’ properties?

Advertisement