१ – प्रास्ताविक

‘मृत्युपत्र कसे करावे’ या विषयावर तू लिही, असा विनंतीवजा आग्रह अनेक मित्रमंडळींकडून अनेक वेळा झाला. मी या विषयावर उत्तम लिहू शकेन अशी त्यांना खात्री वाटली. त्यामुळे मी भारावून गेले. आपण लिहिलेलं उत्सुकतेने वाचणारा वाचकवर्ग आहे, यापेक्षा जास्त एखाद्या लेखकाला काय हवं असतं? अत्यंत नम्रतापूर्वक मी हे काम हाती घेतले आहे.

मृत्युपत्र अगदी केलंच पाहिजे का? जर केलंच तर ते कसं लिहावं? कोणत्या मिळकतींचा त्यात उल्लेख करता येईल? त्या कोणाला देता येतील? या बाबतचे निर्णय अत्यंत खाजगी असतात. ते तसे असलेही पाहिजेत. साधारणपणे आपल्या पतीचा किंवा पत्नीचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सल्ला विचारात घेऊन असे निर्णय घेतले जातात. कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय असे निर्णय घेता येतात. मृत्युपत्राद्वारे मालमत्तेची व्यवस्था लावताना कायदा अगदी थोडी बंधने घालतो. मात्र मृत्युपत्र परिणामकारक व्हावे म्हणून काही अटींची पूर्तता करणे कायद्याने आवश्यक असते. या विषयाला धरून काही पर्यायांची व त्यांच्या कायदेशीर बाजूची चर्चा मी या लेखांमध्ये करणार आहे.

वारसाहक्काबद्दलची चर्चा, मृत्युपत्राबद्दलची चर्चा किंवा एखाद्या व्यक्तीच्या मिळकतीची त्या व्यक्तीच्या   हयातीनंतर कशी व्यवस्था लावता येईल, याबद्दलची चर्चा करताना कोणाच्यातरी मरणाचा उल्लेख अपरिहार्य आहे. उदाहरणार्थ, जर माझ्या लिखाणात ‘तुमच्या मृत्युनंतर’ किंवा ‘जर तुम्ही मरण पावलात’ असे उल्लेख झाले तर ते वाचकांना फारसे आवडणार नाहीत. किंवा जर मी ‘समजा ‘क्ष’ मरण पावला’ असा उल्लेख केला तर वाचकांना एक प्रकारचा अलिप्तपणा जाणवेल. म्हणून माझ्या लेखनात मी ‘माझ्यानंतर’ असा उल्लेख करणार आहे. यातला ‘मी’, कधी ‘स्त्री’ तर कधी ‘पुरुष’ असेन. ‘मी’ विवाहित, अविवाहित, किंवा घटस्फोटीत असेन. ‘मला’ मुलं असतील किंवा नसतीलही. २/३ मुलं असतील, सर्व मुलीच किंवा सर्व मुलगेच किंवा काही मुली आणि काही मुलगे असू शकतील. या सर्व परिस्थिती काल्पनिक असतील. पण आपली चर्चा समजायला सोपी व सुलभ होण्यासाठी हे आवश्यक आहे.

माझे लेख साध्या व सोप्या भाषेत असतील. कायद्याची नेहमीची भाषा मी टाळली आहे. मला असं वाटतं की मृत्युपत्र करणाराने स्वतःच ते लिहावे, जेणेकरून त्याला जे व्यक्त करायचे आहे, ते त्याच्या भाषेत त्याला मांडता आले पाहिजे.

या लेखांमध्ये व्यक्तीचा उल्लेख ‘तो’ असा केला आहे. दर वेळी ‘तो’ / ‘ती’ किंवा ‘त्याचा’ / ‘तिचा’ असे उल्लेख करण्यापेक्षा हे सोपे वाटले. योग्य त्या ठिकाणी ‘तो’ हेच ‘ती’ असे वाचावे. आपला कायदाही हेच म्हणतो.

ही चर्चा करताना माझी भूमिका कधी सर्वसामान्य माणसाची तर कधी वकिलाची असेल. वाचकांनी वाचताना माझी भूमिका ओळखून वाचन करायचे आहे.

मी करविषयक सल्ला देऊ शकत नाही. मालमत्तेचे हस्तांतरण करण्याच्या निर्णयाशी, मग असे हस्तांतरण एखाद्याच्या हयातीत होवो किंवा त्यांच्या मृत्युपश्चात होवो, करविषयक अनेक गोष्टी निगडीत असतात. वाचकांनी कृपया योग्य त्या सल्लागाराकडून असा सल्ला घ्यावा.

माझ्या लेखांमध्ये मध्ये मी जे लिहीन, ती माझी मते आहेत. माझा दृष्टीकोन आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे अवश्यक आहे.

अनुवाद : स्वाती कुलकर्णी.
मूळ लेख : नीलिमा भडभडे. मूळ इंग्रजी लेखासाठी येथे क्लिक करा.

पुढचा लेख: मिळकतीची यादी      List of properties