३ – “माझ्या” मिळकती कोणत्या?

मी जी मिळकतींची यादी तयार करणार आहे, त्यात मला “माझ्या” मिळकतींचा समावेश करायचा आहे.

“माझ्या” मिळकतीं कुठल्या, ते खाली दिले आहे.

  • स्वनिर्मित मिळकती – उदाहरणार्थ माझ्या जमिनीवर मी बांधलेली इमारत, मी लिहिलेले पुस्तक, मी काढलेले चित्र, मी तयार केलेला यंत्राचा नमुना. त्याच्या निर्मितीची तारीख.
  •  मी विकत घेतलेली मालमत्ता व खरेदीचा तपशील.
  •  मला मृत्युपत्राद्वारे किंवा मृत्युपत्राशिवाय वारशाने मिळालेली   मालमत्ता व ती कशी मिळाली त्याचा तपशील.
  • मला बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता- येथे बक्षीस देणारा आणि बक्षीसपत्राची तारीख हा तपशील.
  • एखाद्या योजने(स्कीम) मध्ये मंजूर करून मला वाटप (अ‍‍‍‍‍लॉट) करण्यात आलेली मालमत्ता, आणि त्या योजनेचा तपशील व आणि मंजुरीची तारीख.
  • अशी मालमत्ता जी मी माझी आहे असे मी समजते : (उदाहरणार्थ माझ्याकडे असणारा एखादा जुना आजीचा-पणजीचा दागिना), पण ती अजून कोणाच्या मालकीची आहे का, ते मला माहित नाही.
  • अशी मालमत्ता जी माझ्या मालकीची आहे, असा माझा दावा आहे. उदाहरणार्थ मला मृत्युपत्राद्वारे मिळालेली एखादी जमीन, जी माझ्या मालकीची आहे असा माझा दावा आहे, परंतु त्याला इतरांनी हरकत घेतलेली आहे.

मी ज्या मिळकतींची विश्वस्त आहे, अशा मिळकतीचा या यादीत समावेश होणार नाही. कारण अशा मिळकती ‘माझ्या’ मिळकती नव्हेत. परंतू माझ्यानंतर विश्वस्त म्हणून कोणाची नेमणूक करावी हे मला ठरवता येऊ शकते. अर्थात या गोष्टी नमूद करण्यासाठी स्वतंत्र यादी तयार करावी लागेल.

एखादी मिळकत माझ्या व इतर कोणाच्या सामायिक मालकी असेल, तर तिचा उल्लेख मी या यादीत करू शकते. सामायिक मालकीच्या मिळकतीतला  माझा हिस्सा ही ‘माझी’ मिळकत आहे.

एखादी मिळकत मला कोणी मृत्युपत्राने दिली असेल, किंवा मृत्युपत्र केलेले नसतानाही वारसाहक्कामुळे मला मिळाली असेल, तर ज्या व्यक्तीकडून ती मला वारस म्हणून मिळाली तर ती व्यक्ती मरण पावताच मी अशा मिळकतीची  मालक होते.  त्याकरता ती मिळकत माझ्याकडे हस्तांतरीत होण्याची किंवा सरकारी नोंदींमध्ये माझे नाव ‘मिळकतीचा मालक’ म्हणून लागण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नसते. अशी नोंद होणे ही औपचारिक बाब असते, त्याला बराच वेळही लागतो. अर्थात असे नाव लावून घेणे हे महत्वाचे असतेच. ज्यावेळी मी एखादी वापरलेली गाडी विकत घेते, त्यावेळेसच मी त्या गाडीची मालक होते. आर.टी.ओ. मधील नोंदी बदलून घेणे ही औपचारिकता फक्त शिल्लक राहते. अर्थात अशा नोंदी तातडीने पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जर मी एखादी मिळकत विकत घेण्याचे कबूल केले असेल, तर अशा मिळकतीचाही   मी या यादीत समावेश करेन. उदाहरणार्थ, मी एका बिल्डर कडून एका योजनेत एखादी सदनिका (फ्लॅट) विकत घेण्याचे साठेखत केले असेल, तर त्या मिळकतीचे वर्णन आणि या व्यवहाराचा  सर्व तपशील माझ्या यादीत लिहिला पाहिजे.

जर एखाद्या मिळकतीबद्दल न्यायालयात दावा चालू असेल, तर अशा मिळकतीचा आणि दाव्याचा संपूर्ण उल्लेख मी यादीत करेन.

मिळकतींची अशी यादी करण्यामागे बरीच कारणे आहेत.

  • माझ्या नक्की किती आणि कोणकोणत्या मिळकती आहेत जे जाणून घेणे. त्यांच्या बद्दलचे सर्व तपशील या यादीच्या स्वरूपात नजरेसमोर असतील तर माझ्या हयातीत त्यांची व्यवस्था पाहणे, नोंदणी, हस्तांतरण, नामनिर्देशन इत्यादी औपचारिक गोष्टींची पूर्तता करणे सोपे होईल.
  • मृत्युपत्र करावे की नाही हा निर्णय घेता येईल. तसेच मृत्युपत्राद्वारे या मालमत्तांची कशी व्यवस्था करता  येईल, हे ही ठरवता येईल.
  • माझ्यानंतर माझ्या सर्व मिळकतींबद्दलची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल व त्यांची नीट व्यवस्था लावणे शक्य होईल.

माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी हे सांगू शकते की अशी यादी करायला बराच वेळ आणि खूप जास्त चिकाटीची गरज असते आणि संयम ठेवावा लागतो.

अनुवाद : स्वाती कुलकर्णी.
मूळ लेख : नीलिमा भडभडे. मूळ इंग्रजी लेखासाठी येथे क्लिक करा.

 मागचा लेख: मिळकतींची यादी    List of properties
पुढचा लेख: कागदपत्रांची पूर्तता व नोंदी      Completing documents and record

Advertisement