४ – कागदपत्रांची पूर्तता व नोंदी

माझ्या मिळकतींची यादी करत असताना किंवा करून झाल्यावर प्रत्येक मिळकतीशी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे माझ्याजवळ आहेत का? व प्रत्येक मिळकतीशी संबंधित नोंदी अद्ययावत व परिपूर्ण आहेत का? हे मला तपासून पाहिलेच पाहिजे.

जमीन, घर, सदनिका, शेड

जर माझ्याकडे जमिनीचा प्लॉट असेल तर त्यावर माझे नाव ‘मालक’ म्हणून नोंद झालेले आहे की नाही याची खात्री मी करून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहनिर्माण प्राधिकरण, राज्य औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणच्या नोंदींमध्ये माझेच नाव या प्लॉटचा मालक म्हणून लागलेले आहे ना? याची खात्री मी करून घेतली पाहिजे. जर मी जमीन मालक असेन तर राज्याच्या महसूल नोंदींमध्ये माझे नाव सदर जमीनीचा मालक म्हणून नोंदलेले असले पाहिजे. महाराष्ट्रात या नोंदी जमीनीचा ७/१२ चा उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा या स्वरूपात असतात. इतर राज्यांमध्ये या नोंदींना खसरा, जमाबंदी अशी नावे आहेत.

जर मी एखाद्या घराची किंवा सदनिकेची  मालक असेन, तर सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट कन्डोमिनियम यांच्या पुस्तकांमध्ये, महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या पावतीमध्ये आणि वीजजोडणी व वीज बिलामध्ये माझे नाव मिळकतीची मालक म्हणून नोंदलेले असलेच पाहिजे.

जर एखादी मालमत्ता खरेदी, भाडेपट्टा किंवा बक्षिसपत्राने माझ्याकडे हस्तांतरीत होऊन आली असेल, तर अशा परिस्थितीत त्या मालमत्तेचे खरेदीखत, भाडेपट्टा करार किंवा बक्षिसपत्र असे माझी मालकी सिद्ध करणारे संबंधित दस्तऐवज माझ्याकडे असलेच पाहिजे.

जर माझी मालमत्ता एखाद्या बँकेकडे गहाण असेल, तर अशा गहाणखताची प्रत माझ्याकडे असायलाच हवी. त्याचप्रमाणे त्या मालमत्तेची मूळ मालकी माझी असल्याचा हक्कलेख (टायटल डीड) बँकेकडे आहे, अशी बँकचे पत्र  माझ्याजवळ हवे..

जर माझी मालमत्ता म्हणजे सामायिक मालमत्तेचे विभाजन होऊन मला मिळालेला त्यातील हिस्सा असेल (जसे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप), तर अशा वाटपाचे मूळ वाटपपत्र माझ्याकडे असले पाहिजे. जर मूळ वाटपपत्र इतर कोणत्या हिस्सेदाराकडे असेल, तर त्या मूळ वाटपपत्राची नोंदणी कार्यालयातून घेतलेली प्रमाणित नक्कल माझ्याकडे असलीच पाहिजे.

यापैकी कोणत्याच नोंदींमध्ये, माझ्या मिळकतींवर माझे नाव ‘मालक’ म्हणून लागलेले नसेल तर तशी नोंद मला करून घ्यावी लागेल.

ही सर्व कागदपत्रे माझ्या फाईल मध्ये आहेत का? नसतील तर ती मिळवायला सुरुवात करायला हवी.

बँकखाती व गुंतवणुका 

माझ्या प्रत्येक आर्थिक गुंतवणुकीचा तपशील मी फाईल मध्ये लिहून ठेवला पाहिजे. बँक खात्यांची पासबुके अथवा छापील स्टेटमेंटस्, शेअर्स अथवा युनिट्स खरेदी केल्याची पावती, ठेवींबद्दलचे एन एस डी एल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) कडून मिळालेले स्टेटमेंट ही सर्व कागदपत्रे फाईलमध्ये असणे आवश्यक आहे.

जर माझ्या काही ठेवी ऑनलाईन असतील तर अशा ठेवींच्या पावत्यांच्या छापील प्रती माझ्याकडे असणे आवश्यक आहे. माझ्या   ऑनलाईन ठेवींबाबत आणि डीमॅट स्वरूपातील व्यवहारांबाबत मला अधिक दक्ष आणि सावध राहिले पाहिजे. ठराविक काळानंतर, म्हणजे समजा दर तीन महिन्यांनी, या ऑनलाईन ठेवी व्यवस्थित आहेत ना हे मला तपासून पाहिले पाहिजे.

नामनिर्देशन

जर एखाद्या मालमत्तेच्या बाबतीत नामनिर्देशन आवश्यक असेल, तर मी ते केले आहे की नाही याची खात्री मी करून घेतली पाहिजे. जर नामनिर्देशन केले असेल, तर ते केले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या मालमत्तेच्या नोंदीत असायलाच हवा (उदा. बँकेच्या ठेव-पावतीवर). तसा तो नसेल तर त्या मालमत्तेची नोंद मी दुरुस्त करून घेतली पाहिजे.

माझ्या यादीत मी कोणत्या मालमत्तेसाठी कोणाचे नामनिर्देशन केले आहे (नॉमिनी म्हणून कोणाला नेमले आहे) याचा उल्लेख असायला हवा.

अचूक नावे

बँका, कंपन्या, म्युचुअल फंड्स, व इतर वित्तीय संस्था या सर्व ठिकाणी मालमत्ता धारक व नामनिर्देशित व्यक्ती यांची अचूक व योग्य नावे नोंदली गेली आहेत ना याची मला खात्री करून घ्यावी लागेल. अशा व्यक्तींची नावे त्यांच्या पॅनकार्ड वरील नावाशी जुळली पाहिजेत.

अनुवाद : स्वाती कुलकर्णी.
मूळ लेख : नीलिमा भडभडे. मूळ इंग्रजी लेखासाठी येथे क्लिक करा.

मागचा लेख: “माझ्या” मिळकती कोणत्या?    What are ‘my’ properties?

Advertisement